धक्कादायक..! मजुरी पेक्षा अधिक पैशाची मागणी पुर्ण न झाल्याने दांड्याने प्रहार करून केला खुन

0
धक्कादायक..!

 मजुरी पेक्षा अधिक पैशाची मागणी पुर्ण न झाल्याने दांड्याने प्रहार करून केला खुन 


ज्याचा खून केला त्याच्या अंत्ययात्रेतही सामील झाला; आरोपीला पोलीसांनी केली अटक

अमरावती: - मजुरी पेक्षा अधिक पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने दांड्याने प्रहार करून खून केला असल्याची घटना तिवसा येथे घडली 
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सुवर्णकार संजय मांडळे यांची हत्येप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. शहरात दिवसाढवळ्या सुवर्णकाराचा खून झाल्याने तिवसामध्ये खळबळ उडाली होती.

मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. केवळ मजुरीचे पैसे वाढवून दिले नाही म्हणून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खून करणारा दुसरा तिसरा कुणी नसून गेले चार महिने घरात गवंडीकाम करणारा मजूर निघाला आहे. याप्रकरणी रोशन तांबटकर (वय २५) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. रोशन हा मूळचा वर्धा शहरातील देऊरवाडा येथील रहिवासी आहे. मृतक मांडळे यांच्या घराच्या नूतनीकरणाचे काम गेले चार महिने सुरू होते. रोशन हा मांडळे यांच्या घरात चार महिने गवंडीकाम करीत आहे. यादरम्यान मांडळे यांच्या मुलासोबत आरोपी रोशन याची मैत्री झाली होती. शिवाय मांडळे कुटुंबीय कधी कुठे जातात, याची अचूक माहिती आरोपीने टिपून घेतली होती. त्यामुळे घरात कुणी नसताना आरोपीने मृतक मांडळे यांना सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी दुपारी एकटे गाठले. त्यांच्याकडे मजुरीपेक्षा अधिक पैशाची मागणी केली होती. परंतु मांडळे यांनी अधिक पैशासाठी नकार देताच आरोपीने त्यांचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
खून करून पळाला; नंतर अंत्यसंस्कारासाठी परत आला होता 
दर सोमवारी मांडळे यांचा मुलगा आईला घेऊन अमरावतीला जातो. त्यामुळे सुवर्णकार मांडळे हे घरी एकचे असतात हे आरोपीला माहीत होते. सोमवारी सायंकाळी ५ वाजता आरोपी रोशन मद्यधुंद अवस्थेत मांडळे यांना भेटायला पहिल्या मजल्यावर गेला. तेथे त्याने मांडळे यांना आहे त्या मजुरीपेक्षा अधिक पैशांची मागणी केली. परंतु मांडळे यांनी नकार दिला. मांडळे यांच्या नकाराने चिडलेल्या अवस्थेत आरोपी रोशन खाली आला. खाली येऊन त्याने कुदळीचा दांडा हातात घेऊन परत पहिल्या मजल्यावर गेला. तेथे त्याने मांडळे यांच्याकडे सोपसुपारी मागितली. मांडळे यांनी सोपसुपारीचा डबा त्याच्यासमोर धरला. नंतर डबा ठेवण्यासाठी ते मागे वळताच आरोपीने कुडळीच्या दांड्याने डोक्यावर प्रहार करून सुवर्णकार मांडळे यांचा खून केला होता. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले दागिने तसेच रोख रक्कम लंपास करून आरोपी रोशन बाइकने घटनास्थळावरून पळून गेला होता. परंतु काही तासांतच रात्री आठच्या सुमारास तो मांडळे यांच्या घरी परतला आणि अंत्ययात्रेत सामील सुद्धा झाला होता, अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली, पोलिसांनी आरोपीकडून ७ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !